छुप्या कॅमेऱयाद्वारे पासवर्डची चोरीचा संशय, दहा जणांना फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
रविवारी दिवसभरात बेळगाव शहर व उपनगरातील दहाहून अधिक ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम भामटय़ांच्या एका टोळीने गायब केली आहे. यासंबंधी सोमवारी सीईएन विभागात तक्रार करण्यात आली असून एटीएममध्ये छुपा कॅमेरा ठेवून पासवर्ड चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नेहमी ‘तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. नव्या कार्डसाठी जुन्या कार्डचा पासवर्ड द्या’ अशी बतावणी करून बँक खात्यातील रक्कम हडप करण्यात येत होती. आता भामटय़ांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केला आहे. ग्राहकाला पत्ता नसतानाच खात्यातील रक्कम गायब केली जात आहे.
रेल्वे ओव्हरब्रिजजवळील गोकुळनगर येथे राहणाऱया रावसाहेब पुंडलिक मोहिते यांच्या मोबाईलवर रविवारी दोन मेसेज आले. दोन वेळा त्यांच्या बँक खात्यातून दहा-दहा हजार रुपये काढल्याचा उल्लेख त्या मेसेजमध्ये होता. आपण तर पैसे काढले नाहीत. असे असताना बँकेकडून असा मेसेज का आला? असा प्रश्न त्यांना पडला.
सोमवारी त्यांनी टिळकवाडी येथील महाराष्ट्र बँकेत जाऊन चौकशी केली. आपण कोणाला पासवर्ड दिला नाही तरीही आपल्या खात्यातील 20 हजार रुपये कसे गायब झाले? अशी विचारणा केली. ‘तुम्ही कोणाला तरी पासवर्ड किंवा ओटीपी दिला असणार. त्यामुळेच तुमच्या बँक खात्यातील रक्कम गायब झाली असणार’, असे कर्मचाऱयांनी सांगितले.
त्यानंतर रावसाहेब यांनी सीईएन पोलीस स्थानक गाठले. त्यांच्या आधी 8 ते 9 जण तक्रार करण्यासाठी तेथे पोहोचले होते. बसवण कुडची येथील आकाश हिंडलगेकर या तरुणाच्या बँक खात्यातून 20 हजार रुपये काढण्यात आले आहेत. फोर्ट रोडवरील एका कारखानदाराच्या बँक खात्यातून 40 हजार रुपये हडप करण्यात आले आहेत. सुमारे 8 ते 10 जणांच्या खात्यातून 3 लाखाहून अधिक रक्कम गायब करण्यात आली आहे.
यासंबंधी सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत. ज्या ज्या बँक खात्यातून रक्कम गायब करण्यात आली आहे. त्या खात्यांविषयी माहिती मिळविण्यात येत आहे. या प्रकरणी संपूर्ण चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
पासवर्ड चोरल्याचा संशय
यापूर्वी एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगत पासवर्ड किंवा ओटीपी घेऊन ग्राहकांच्या खात्यातील रक्कम हडप करण्यात येत होती. रविवारी ज्या 8 ते 10 जणांची रक्कम काढण्यात आली आहे, त्यांना आपल्या मोबाईलवर मेसेज येईपर्यंत याची कल्पनाही नव्हती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी बहुतेक जणांनी शहापूर येथील एका एटीएममधून पैसे काढले आहेत. या एटीएममध्ये छुपा कॅमेरा लावून भामटय़ांनी ग्राहकांचा पासवर्ड चोरल्याचा संशय आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रविवारी दुपारी 4 नंतरच या सर्व ग्राहकांची रक्कम हडप करण्यात आली आह