वहागाव येथील घटना; 55 हजाराचा ऐवज लंपास
प्रतिनिधी/ उंब्रज
आशियाई महामार्गावर वहागाव (ता. कराड) गावच्या हद्दीत आयडीएफसी बँकेच्या मॅनेजरला रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवून 55 हजारांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. दोन अज्ञात चोरटय़ांनी दुचाकीवरून पाठीमागून येऊन गाडीला धक्का लागल्याचे कारण पुढे करुन चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी व पाकिटातील तीन हजारांची रोकड घेऊन पोबारा केला आहे.
याप्रकरणी प्रदीप बबनराव पाटील (वय 37, व्यवसाय मॅनेजर आयडीएफसी शाखा, शनिवार पेठ, सातारा, मुळ राहणार तांबवे, ता. वाळवा) यांनी तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार 19 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास प्रदीप पाटील हे सातारा ते तांबवे असा दुचाकीने महामार्गाने प्रवास करीत होते. वहागाव येथे आल्यानंतर दोन अनोळखी चोरटय़ांनी पाठीमागून येऊन तुझ्या गाडीने धक्का दिला आहे, असे म्हणून पाटील यांना दुचाकी आडवी मारुन, सेवा रस्त्यावर नेऊन हाताने मारहाण केली. जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीची 1 तोळे 7 ग्रॅम वजनाची चेन हिसकावून घेतली. हातातील 9 ग्रॅम वजनाची 17 हजार रुपये किमतीची अंगठी देत नसल्याने धारधार शस्त्र दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. सोन्याची अंगठी, खिशातील पाकीट व त्यामधील रोख 3000 रुपये व इतर सुट्टे पैसे, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गाडीचे कागदपत्र झेरॉकस, आयडीएफसीचे एटीएम, इतर बँकांची एटीएम व कागदपत्रे हिसकावून पोबारा केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील करीत आहेत.