प्रतिनिधी/ रत्नागिरी
बँकेच्या संयुक्तपणे घेतलेल्या लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे 9 लाख रुपये किंमतीचे दागिने काढून परस्पर विक्री करणाऱया चुलत्याविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हय़ाचा आरोप संशयित श्रीधर विठ्ठल भावे (मुळ रा. पुणे) यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याविषयी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार, धनश्री अभ्यंकर आणि त्यांचे काका श्रीधर भावे ही दोघं नात्याने काका-पुतणी आहेत. या दोघांनी रत्नागिरीतील शिवाजीनगर येथील जनता सहकारी बँकेच्या संयुक्तपणे घेतलेल्या लॉकरमध्ये दागिने ठेवले होते. 18 फेब्रुवारी 2012 रोजी हे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. पण 16 मार्च 2015 ते 31 जानेवारी 2022 या मुदतीत काका श्रीधर भावे यांनी लॉकरमधील सुमारे 9 लाख रुपये किंमतीचे दागिने काढून त्यांची परस्पर विक्री केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्या बाबत धनश्री अभ्यंकर यांना कोणतीही कल्पना श्रीधर यांनी दिलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दागिने बँकेत असल्याने निर्धास्त असलेल्या धनश्री अभ्यंकर रत्नागिरीत आल्या. त्यावेळी बँकेतील दागिन्यांबाबत चौकशी केल्यानंतर त्यांना काका श्रीधर भावे यांनी दागिने बाहेर काढल्याची बाब समजली. त्या बाबत काकांना विचारणा केली असता ते दागिने काढून त्याची विक्री केल्याचे काकांनी सांगितले. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने धनश्री अभ्यंकर यांनी 1 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या बाबत अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.