दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर टाकले दाभोळ खाडीत
प्रतिनिधी/ गुहागर
तालुक्यातील वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापक सुनेत्रा सुनील दुर्गुले यांच्या खूनप्रकरणी गुहागर पोलिसांना अवघ्या 4 तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. या प्रकरणी बँकेच्या सराफासह नवानगर येथील दुसऱया साथीदाराला अटक करण्यात आली आहे. दुर्गुले यांचा प्रथम गळा आवळून खून करून त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाच्या कंबरेला नायलॉन दोरीने बांधून व दुसऱया टोकाला काळे दगड बांधून दाभोळ खाडीत टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
संजय श्रीधर फुणगुसकर, (40) आणि सत्यजीत बबन पटेकर (32, दोघेही वेलदूर-नवानगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. गुरूवारी सकाळी दाभोळ खाडीतील वेलदूर-नवानगर जेटीजवळ पाण्यात सुनेत्रा दुर्गुले यांचा मृतदेह सापडला होता. दाभोळ खाडीतील नवानगर जेटीजवळ पाण्यात मृतदेह असल्याची माहिती गुहागर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याची ओळख पटल्यावर तपासाची सूत्रे जलदगतीने हलवण्यात आली. मृत दुर्गुले या प्रथम कोणाच्या संपर्कात आल्या होत्या, याची माहिती घेतली असता बँकेचा सराफ म्हणून काम पाहणारा संजय श्रीधर फुणगूसकर याचे नाव पुढे आले. त्याच्याकडून माहिती मिळवून त्यानंतर मृताच्या नातेवाईकांकडून अधिक माहिती मिळवण्यात आली. यात फुणगूसकर याने दिलेली व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती यात तफावत आढळली. यामुळे पोलिसी खाक्या दाखवताच फुणगूसकर याने गुन्ह्य़ाची कबुली देत आपल्याबरोबर नवानगर येथीलच सत्यजित पटेकर याचाही या खूनात सहभाग असल्याचे सांगितले.
सात लाखाच्या हव्यासापोटी केला खून
मृत सुनेत्रा दुर्गुले यांनी सोन्याच्या व्यवहारासाठी आपल्याबरोबर 7 लाख रूपये आणले होते. या 7 लाखाच्या हव्यासापोटी दोन्ही आरोपींनी दुर्गुले यांचा दोरीने गळा आवळून खून केला व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो वेलदूर नवानगर येथील जेटीवर आणला. यावेळी मृतदेहाच्या पायाला व कमरेला रस्सी बांधून रस्सीला दोन मोठे दगड बांधून पाण्यात ढकलून दिले.
अवघ्या चार तासातच अटक
आरोपींना अवघ्या 4 तासांतच अटक करण्यात गुहागर पोलिसांना यश आले. हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरणकुमार कदम, पोलीस सहाय्यक निरीक्षक बी. के. जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद पवार, पोलीस कॉन्स्टेबल राजू कांबळे, सचिन पाटील, सचिन चव्हाण, संतोष साळसकर, संतोष माने, वैभव चौगुले, हेमलता कदम, आदिनाथ आदवडे, एलसीबीचे संजय जाधव, सुभाष भागणे, शांताराम झोरे, राकेश बागुल, अरूण चाळके, गुरू महाडिक, रमीझ शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील मिलिंद चव्हाण, इम्रान शेख, मनोज कुळे यांच्या पथकाने केला. आरोपींवर भा.दं.वि.क. 302, 201, 397, 34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाला 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, दुसरा मानसिक आजाराने त्रस्त
अटक करण्यात आलेल्या संजय फुणगूसकर व सत्यजित पटेकर या दोघांना शुक्रवारी गुहागर न्यायालयात हजर केले असता यातील फुणगूसकर याला 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीच्या बाजूने वकिलांनी दुसरा आरोपी सत्यजित पटेकर हा मानसिक आजारी असल्याच्या केलेल्या अपिलामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरणकुमार कदम करत आहेत.