प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील ओल्ड ग्रँट बंगल्यांच्या सर्व्हेक्षणाबाबत दि. बेळगाव कॅन्टोन्मेंट रेसिडेन्टस् वेल्फेअर असोसिएशनने देखील आक्षेप घेतला आहे. बंगल्यांची देखरेख करण्याची जबाबदारी डीईओ (डिफेन्स इस्टेट ऑफिसर) यांच्याकडे असताना कॅन्टोन्मेंट बोर्डने सर्व्हेक्षण करण्याची गरज काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. सदर सर्व्हेक्षण रद्द करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन असोसिएशनच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डला देण्यात आले आहे.
कॅन्टोन्मेंट मधील ओल्ड ग्रँट बंगल्यातील अतिक्रमणाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र याला सदस्यांबरोबर आता कॅन्टोन्मेंट रहिवासी संघटनेने देखील आक्षेप घेतला आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात विविध प्रकारच्या जागा आहेत. 16 कॅटॅगरीमध्ये जागांची विभागणी करण्यात आली आहे. ओल्ड बंगले असलेल्या जागेची कॅटेगरी ‘बी-3 लँड’ मध्ये मोडते, सदर जागेची देखभाल करण्याची जबाबदारी डीईओ (डिफेन्स इस्टेट ऑफिसर) बेंगळूर येथील नोडल अधिकाऱयांकडे सोपविण्यात आली आहे. डीईओ यांच्याकडून ओल्ड ग्रँट बंगल्यातील अतिक्रमणातील सर्व्हेक्षण करण्यात आले होते. पण सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डने सर्व्हेक्षण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. वास्तविक पाहता सर्व्हे करण्याचा अधिकार डीईओचा असून, सदर विभागाकडून सर्व्हेक्षण करण्यासाठी कोणतीच सूचना करण्यात आली नाही. सदर सर्व्हेक्षण करण्यासाठी डीईओची परवानगी नसताना कॅन्टोन्मेंट कसे करणार असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
कॅन्टोन्मेंटमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाल्यास डीईओकडुन पाहणी करून कारवाई करण्यात येते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिक्रमण झाल्यास महापालिकेकडून कारवाई करण्यात येते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील कारवाई कोणत्या आधारे करणार असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यापूर्वी 2012 मध्ये 16 बंगल्यांचे रिझम्प्शन करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने प्रयत्न केले होते. पण रिझम्प्शन करता आले नाही. पण आता पुन्हा सर्व्हेक्षण करण्यासाठी कॅन्टोन्मेंटने प्रयत्न चालविले आहेत. सर्व्हेक्षण करण्याचा अधिकार डीईओला असताना कॅन्टोन्मेंट बोर्डला सर्व्हेक्षण करता येणार नाही. त्यामुळे कायद्याच्या तरतुदींचा विचार करून कॅन्टोन्मेंटने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.