दुर्गा विसर्जन करून परतणारे लोक लक्ष्य – वाहनांची तोडफोड
वृत्तसंस्था/ दुर्गापूर
पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जन करून परतणाऱया लोकांवर शनिवारी रात्री गावठी बॉम्बनी हल्ला करण्यात आला आहे. पश्चिम वर्धमान जिल्हय़ातील दुर्गापूर शहराच्या अन्नपूर्णा भागात ही घटना घडली आहे. बॉम्ब फेकल्यावर आरोपींनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी लोकांना शांत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व हल्लेखोर फरार असून त्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके स्थापन करण्यात आल्याच माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त ध्रूवज्योति मुखर्जी यांनी दिली आहे.
तर या संघर्षामागे मद्यपान हे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्गा विसर्जन करून परतणाऱया एका गटाकडून दुसऱया गटाच्या लोकांनी मद्य खरेदीसाठी पैशांची मागणी केली होती. यावरून दोन्ही गटांमध्ये भांडण झाले. प्रकरण विकोपास गेल्यावर दुसऱया गटाच्या लोकांनी गावठी बॉम्बनी हल्ला केला आहे.