उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड निवडणूक लढविणारः पक्षाचे नाव बदलण्याचा विचार
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगाल निवडणुकीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना भिडल्यावर ममता बॅनर्जी आता तृणमूल काँग्रेसला देशव्यापी स्वरुप मिळवून देऊ पाहत आहेत. यावरून पक्षामध्ये तृणमूलच्या नावात बदल करण्याची सूचना केली गेली आहे. नव्या नावासंबंधी कामही सुरू झाले आहे. तृणमूल काँग्रेसच्या पूर्वी किंवा त्यानंतर पूर्ण भारताशी संबंधित शब्द जोडण्यासाठी खलबतं सुरू आहेत.
ममता बॅनर्जी आता पुढील वर्षी होणाऱया उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये होणाऱया निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचे उमेदवार उभे करणार आहेत. याकरता आतापासूनच तयारी केली जात आहे. उत्तरप्रदेशात मरगळलेल्या बहुजन समाज पक्षाचे अनेक नेते तृणमूलच्या संपर्कात आहेत. उत्तरप्रदेशात बसपचे वरिष्ठ नेते सतीश चंद्र मिश्रा यांच्यासोबत संपर्क साधण्यात आला आहे.
संबंधित राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्यास प्राथमिकता असणार आहे. एखाद्या पक्षासोबत मिळून निवडणूक लढवत सत्तारुढ पक्षाला आव्हान देता येत असल्यास आम्ही आघाडी करू असे तृणमूलच्या एका नेत्याने म्हटले आहे. या राज्यांमध्ये निवडणुकीतील प्रमुख संभाव्य मुद्दा कोरोना काळातील गैरव्यवस्थापनाचा असणार आहे. या राज्यांमधील महिला मतदारांकरता विशेष रणनीति आखली जात आहे.
शेतकऱयांचे मुद्दे उपस्थित करण्याचाही विचार सुरू आहे. उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशात भाजपला आव्हान देण्याची तयारी सुरू आहे. याकरता भाजपच्या असंतुष्ट नेत्यांशी संपर्क साधून त्यांना स्वतःसोबत घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहे. उत्तरप्रदेशात काही उद्योगपतींच्या घराण्यांशी संपर्क साधला जात आहे. त्यांना बंगालमध्ये येण्याचे निमंत्रण देण्यासह स्वस्त दरात जमीन देत अन्य सुविधा पुरविण्याचे नियोजन सुरू आहे.
नाव बदलण्याची शक्यता
तृणमूल काँग्रेस आता बंगालपुरती मर्यादित न राहता अन्य राज्ये आणि त्यानंतर 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत देशभरात स्वतःचे उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. अशा स्थितीत पक्षाचे नाव बदलण्याची सूचना पक्षप्रमुखांना करण्यात आली आहे. देशव्यापी पक्षाचा दर्जा मिळावा याकरता हा बदल केला जाणार आहे. काही सूचना प्राप्त झाल्या असून त्यासंबंधी गांभीर्याने विचार केला जात आहे.