पंतप्रधानांसह ममता बॅनर्जींनी व्यक्त केला आनंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युनेस्कोने बुधवारी बंगालच्या दुर्गापूजेला सांस्कृतिक वारशाचा (हेरिटेज) दर्जा दिला. युनेस्कोच्या या घोषणेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रत्येक देशवासियांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. प्रत्येक बंगालीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. दुर्गापूजा ही आपल्यासाठी उपासनेपेक्षा मोठी असल्याचे ममता म्हणाल्या.
पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा मोठय़ा थाटामाटात साजरी केली जाते. मात्र, आता तो देशाच्या इतर भागांमध्येही मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. पश्चिम बंगाल सरकारने दुर्गापूजेला हेरिटेज दर्जा देण्याची विनंती युनेस्कोकडे केली असून आता मान्य करण्यात आली आहे. सांस्कृतिक वारसा म्हणजे केवळ चिन्हे आणि वस्तूंचा संग्रह नसून, त्यात आपल्या पूर्वजांच्या परंपरा आणि भावनांचा समावेश होत असल्यामुळेच दुर्गापूजेला हेरिटेजचा दर्जा देत असल्याचे युनेस्कोने म्हटले आहे. आम्ही भारत आणि भारतीयांचे अभिनंदन करतो. आम्हाला आशा आहे की दुर्गापूजेचा मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश झाल्यानंतर स्थानिक लोक आनंदित होतील, असेही ट्विट युनेस्कोने दुर्गा मूर्तीच्या छायाचित्रासह केले आहे.