बंगालमध्ये लस प्रमाणपत्रावर ममतांचा फोटो भाजपकडून राज्य सरकार लक्ष्य
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये आता कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरून राजकारण सुरू झाले आहे. तिसऱया टप्प्यात लसीकरणात देण्यात येणाऱया प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
बंगाल सरकारच्या या निर्णयावर भाजप भडकला आहे. तृणमूल काँग्रेस पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा मानत नाही. बंगालमध्ये एका वेगळय़ा निर्भर देशाप्रमाणे तृणमूल वर्तन करत आहे. पश्चिम बंगाल हे भारताचेच एक राज्य असल्याचे तृणमूल काँग्रेस मानण्यास तयार नसल्याची टीका भाजप प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी केली आहे.
तृणमूलने बंगाल निवडणुकीदरम्यान लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींच्या छायाचित्रावरून आक्षेप घेतला होता. तृणमूलने याला आचार संहितेचा भंग ठरवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पण तृणमूलला आता लसीकरण प्रमाणपत्रावर ममतांचे छायाचित्र लावणे चुकीचे वाटत नसल्याचे भट्टाचार्य यांनी म्हटले आहे. भाजप जर स्वतःच्या नेत्याचे छायाचित्र प्रमाणपत्रावर लावत असल्यास आमच्याकडूनही याचे अनुकरण केले जाऊ शकते असे उद्गार तृणमूल खासदार सौगत रॉय यांनी काढले आहेत.