ममतांच्या विरोधात भाजपच्या भात्यातून नवा बाण
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजकीय महाभारतात सर्वच पक्ष स्वतःच्या भात्यातून बाण बाहेर काढत आहेत. याचदरम्यान भाजपने तृणमूल काँग्रेस तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपकडून ट्विटरवर एक छायाचित्र प्रसारित करण्यात आले असून यात ‘बंगाल स्वतःची मुलगी इच्छितो, आत्या नको’ असे नमूद आहे. या ट्विटमध्ये राज्य भाजपशी संबंधित अनेक महिला नेत्यांची छायाचित्रे आहेत.
छायाचित्रात सर्वप्रथम भाजप खासदार देवश्री चौधरी तर दुसऱया क्रमांकावर खासदार लॉकेट चटर्जी आहेत. देवश्री बंगालमधील भाजपच्या दलित नेत्या आहेत. रायगंजच्या खासदार देवश्री यांना केंद्रात महिला तसेच बाल विकास राज्यमंत्रिपद मिळाले आहे. याचबरोबर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा अग्निमित्रा पॉल, राज्यसभा खासदार रुपा गांगुली समवेत अनेक महिला नेत्यांची छायाचित्रे आहेत. तर दुसरीकडे ममतांचे छायाचित्र आहे.
बंगालच्या शुद्धीसाठी आत्याने जावे
यापूर्वी भाजपच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक बंगाली गाणे प्रसारित करण्यात आले. ‘बंगाल दीदीपासून मुक्तता इच्छित आहे’ अशा अर्थाच्या हॅशटॅगसह या गाण्याच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. गाण्याच्या प्रारंभी हावडा ब्रिजची पार्श्वभूमी असून प्रतिकात्मक स्वरुपात लोक आत्महत्या करताना दिसून येतात. या गाण्याद्वारे राजकीय हत्यांप्रकरणी तृणमूलला लक्ष्य करण्यात येत आहे.
बंगालला मुलगी हवी मोहीम बंगालच्या शुद्धीसाठी ‘पीशी जाओ’ (आत्याने जावे) असे बंगाली गाण्याद्वारे सांगण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसने 20 फेब्रुवारी रोजी ‘बंगालला स्वतःची मुलगी हवी आहे’ अशी मोहीम सुरू केली होती. याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘बुआ जाओ’चा वापर केला.