शहापूर येथील घटनेने खळबळ, मालकाला 1 कोटीचा फटका : पोलीस तपास सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
सोने घेऊन दागिने बनवून देणाऱया पाच बंगाली कारागिरांनी मालकाला ठकवून दोन किलो, 170 ग्रॅम सोने घेऊन पलायन केले आहे. सहा दिवसांपूर्वी बिच्चू गल्ली, शहापूर परिसरात ही घटना घडली असून शहापूर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
या प्रकरणी कमल लालचंद पोरवाल यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांच्या कारखान्यात काम करणाऱया शहाबुद्दीन नसरुद्दिन शेख (वय 36), इन्सान (वय 28), सूरज (वय 28), सैफ (वय 25), जहांगीर (वय 42) या पाच कारागिरांवर भादंवि 403, 406, 408, 420 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, उपनिरीक्षक मंजुनाथ व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. या पाच कारागिरांनी 97 लाख 62 हजार 446 रुपये किमतीचे दोन किलो, 170 ग्रॅम सोने पळविल्याचे उघडकीस आले आहे. हे कारागिर पश्चिम बंगालमधील कुलूट दक्षिण (पाश्चिमपारा), महांतेश्वर, बद्रवान येथील राहणारे आहेत.
उपलब्ध माहितीनुसार जाधवनगर येथील कमल पोरवाल यांचा बिच्चू गल्ली, शहापूर येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. पल ज्युवेल्स या कारखान्यात शहाबुद्दीनसह सर्व पाच जण गेल्या चार-पाच वर्षांपासून काम करीत होते. 22 कॅरेटचे सोने घेऊन त्याचे दागिने मुंबईला पाठविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.
दोन-तीन महिन्यांतून एकदा झवेरी बाजार, मुंबई येथून सोने घेऊन येऊन त्याचे दागिने बनवून मुंबईला पाठविण्यात येत होते. या दागिन्यांच्या घडणावळीचा मोबदला मालक घेऊन कारागिरांना पगार दिला जात होता. नेहमीप्रमाणे कमल पोरवाल हे मुंबईतून दोन किलो, 170 ग्रॅम सोने घेऊन आले.
10 फेब्रुवारी रोजी शहाबुद्दीन शेखला आपल्या घरी बोलावून त्याला 22 कॅरेटचे दोन किलो, 170 ग्रॅम सोने देऊन दहा दिवसांत त्याचे दागिने बनविण्यास सांगितले. त्यानंतर आपल्या मालकांच्या घरातून शहाबुद्दीन बाहेर पडला. सोने आणल्यानंतर पाच दिवस सर्व कारागिर कारखान्यात होते. 15 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास सोने घेऊन सर्व पाच जणांनी पोबारा केला आहे.
19 फेब्रुवारी रोजी रात्री यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शहाबुद्दीनसह सर्व पाच बंगाली कारागिरांची माहिती जमविण्याचे काम हाती घेतले असून मालकाला ठकवून 2 किलो, 170 ग्रॅम सोने पळविणाऱया या कारागिरांचा शोध घेण्यात येत आहे. 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेळगावातून पोबारा केलेले कारागिर आपल्या गावी पोहोचले आहेत की आणखी कुठे गेले आहेत? याचा तपास करण्यात येत आहे.
सराफी व्यावसायिकांत खळबळ
शहापूर येथे घडलेल्या या घटनेने सराफी व्यावसायिकांत खळबळ माजली आहे. कारण शहापूर, वडगाव परिसरात सोने घेऊन दागिने घडविणाऱया बंगाली कामगारांची संख्या मोठी आहे. अनेक व्यावसायिक 22 कॅरेटचे सोने देऊन या कारागिरांकडून दागिने बनवून घेतात. यापूर्वी दागिने पळविण्याच्या घटना घडल्या आहेत. आता तर या पाच कामगारांनी मोठय़ा प्रमाणात सोने पळविले आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे.