वृत्तसंस्था/ कोलकाता
देशातील 2021 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला येथे सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग स्पर्धेने रविवारी प्रारंभ झाला. येथे झालेल्या इलाईट ब गटातील सामन्यात यजमान बंगालने ओडिशाचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. दुसऱया एका सामन्यात तामिळनाडूने झारखंडचा 66 धावांनी पराभव केला.
ओडिशा संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सर्वबाद 113 धावा जमविल्या. त्यानंतर बंगालने 12.2 षटकांत 1 बाद 114 धावा जमवित हा सामना 9 गडय़ांनी जिंकला. ओडिशाच्या डावात राजेश धुपरने 37, अंकीत यादवने 32 धावा केल्या. बंगालतर्फे इशान पोरेलने 26 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर बंगालच्या डावात सलामीचा फलंदाज विवेक सिंगने 35 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 54 धावा झळकविताना सुवनकर बालसमवेत दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 76 धावांची भागिदारी केली. बालने नाबाद 34 धावा केल्या.
या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात तामिळनाडूने झारखंडचा 66 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडूने 20 षटकांत 5 बाद 189 धावा जमविल्या. हरी निशांतने नाबाद 92 धावा फटकाविल्या तर दिनेश कार्तिकने 46 धावांचे योगदान दिले. त्यानंतर झारखंडने 20 षटकांत 7 बाद 123 धावा केल्या. आनंद सिंगने नाबाद 28 धावा जमविल्या. तामिळनाडूतर्फे सोनू यादवने 3 तर संदीप वॉरियरने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
ओडिशा 20 षटकांत सर्वबाद 113, बंगाल 12.2 षटकांत 1 बाद 114
तामिळनाडू 20 षटकांत 5 बाद 189, झारखंड 20 षटकांत 7 बाद 123.