अहमद मसूदची पंजशीर खोऱयात कडवी टक्कर ः संघर्षात महिलाही सहभागी
@ काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानमधील पंजशीर परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून दोन गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. या लढाईत शेकडो तालिबान लढाऊ मारले गेले आहेत. पंजशीरमध्ये अहमद मसूद आणि हकालपट्टी केलेले उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे लढाऊ तालिबानला कडवी झुंज देत आहेत. या कृतीने अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापण्याच्या तयारीत असलेल्या तालिबानला मोठा झटका बसला आहे. बंडखोरांनी त्याच्याकडून परवाण आणि बागलाण हे दोन प्रांत हिसकावल्याची माहिती समोर आली आहे. तालिबानसोबतच्या या लढय़ात महिलाही सामील झाल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सरकार स्थापण्याची तयारी सुरू केली असली तरी त्यांच्यासाठी पुढील काळ आव्हानात्मक असणार आहे. अहमद मसूद यांच्या गटाकडून तालिबान्यांच्या हालचालींना सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. साहजिकच, तालिबानने अफगाणिस्तानात सरकार स्थापन केले, तरी त्याला नेहमीच पंजशीर खोऱयातून आव्हानांना सामोरे जावे लागेल. पंजशीर खोऱयाच्या लढाईत तालिबानचे मोठे नुकसान होत आहे. हा भाग दुर्गम डोंगरांच्या मध्यभागी आहे. तालिबान्यांना 1996 ते 2001 या काळात त्यांच्या राजवटीतही पंजशीर क्षेत्र काबीज करता आले नव्हते. पुन्हा एकदा तो प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी धडपडत आहे परंतु त्याला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. तालिबानने पंजशीरच्या लोकांना शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते पण येथील लोकांनी ते ऐकले नाही.
तालिबानचा प्रस्ताव अहमद मसूदने नाकारला
अहमद मसूदने त्यांच्या सरकारमध्ये सामील व्हावे अशी तालिबानची इच्छा आहे. त्यांनी मसूदसोबत याविषयी चर्चाही केली होती, पण तालिबानच्या या प्रस्तावाला ते सहमत नव्हते. मसूद आणि सालेह यांनी तालिबानची विचारधारा नाकारली आहे. अहमद मसूदच्या बेधडक भूमिकेमुळे भविष्यात तालिबानसमोर अनेक आव्हाने निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.