पलूस / प्रतिनिधी
बंडातात्या कराडकर यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम व कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या विषयी आक्षेपार्ह भाष्य केल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा पलूस येथील मुख्य चौकात ठिय्या आंदोलन करून व काळ्या फिती बांधून निषेध केला.पलूस तालुक्यातील फादर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यु.आय. व काँग्रेस सोशियल मीडिया व काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.पलूस येथील डॉ. विश्वजित कदम जनसंपर्क कार्यालयासमोर, मुख्य चौकात तासगाव – कराड रस्त्यावर आज सकाळी आंदोलन करण्यात आले.
स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्यांचे व्यक्तीमत्व व त्यांच्या कार्याची उंची खूप मोठी आहे. त्यांच्या पश्चात राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांचेही आदर्शवत काम सुरू आहे. मात्र, ह. भ.प. बंडा तात्या कराडकर यांनी त्यांचेविषयी आक्षेपार्ह विधान करुन काँग्रेस कार्यकर्ते व डॉ. पतंगराव कदम व डॉ. विश्वजित कदम समर्थकांच्या भावना दुखावल्या आहेत. कराडकर यांनी जाहिरपणे माफी मागावी. त्यांचेवर गुन्हा दाखल करून अटक करावी. अशी मागणी कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात केली. कराडकर व त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यांचे प्रतिमेवर जोडे मारण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ए.डी.पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे मारुती चव्हाण, पांडुरंग सुर्यवंशी, गिरीश गोंदिल, सुशिल गोतपागर यांची भाषणे झाली. निषेधाचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.