पर्ये/वार्ताहर
सुमारे 100 वर्षांची परंपरा असलेल्या बंदिरवाडा सांखळी येथील श्री तोणयेश्वर देवस्थान मंडपाकडे मंगळवार दि. 22 मार्च रोजी वार्षिक ’होमकुंड’ होणार आहे. रात्रीचे 2 वाजण्याच्या सुमारास होमकुंड पेटविण्यात येणार अहे. हे होमकुंड रचण्यासाठी माटणे दोडामार्ग महाराष्ट्र येथून सुमारे 2 ट्रक लाकडे आणल्याची माहिती देवस्थान पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी दिली.
होमकुंड पेटविल्यानंतर त्यातून जाण्यासाठी इतर होमपुंडाप्रमाणे उपास, व्रताची गरज असते, पण येथील या होमकुंडमधून कोणीही जाऊ शकतो. उपास किंवा व्रताची गरज नसते. वडील गोत्राचे व्हडले सावंत यांचा या होमकुंडसाठी पहिला मान असून बाकीच्या समाजालाही मान असून इतर समाजाचेही लोक या होमकुंडात सहभागी होतात. सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन होमकुंड पेटविण्यात येते. पौर्णिमेच्या सहाव्या दिवशी हे होमकुंड पेटविण्याची प्रथा आहे. या रात्री रंग लावणे, गाऱहाणे घालणे होते. लावणी गायन होते. तालगडी सादरीकरण होते. तसेच मांड धरणे हा कार्यक्रम होतो. तसेच श्रीफळ वाढविण्याचाही कार्यक्रम होतो.
रात्री होमकुंड पेटविल्यानंतर या अग्निदिव्यातून येथील उपस्थित आंघोळ करून किंवा हातपाय धुवून जातात. रोमटामेळही या अग्निदिव्यातून जातो. येथील शिमगोत्सव महा शिवरात्रीला सुरु होऊन गुढीपाडव्यापर्यंत चालतो. नवमी दिनी शांतादुर्गा देवीची ’समई’ वाजत गाजत भूमिका सप्तशती मंडपापर्यंत देण्यात येते. होमकुंड झाल्यानंतर रविवार किंवा बुधवार असा दिवस धरून ’रॉट’ घालण्याची प्रथाही याठिकाणी आहे. शिमगोत्सवाच्या कार्यकाळात रोमटामेळ सादर केले जातात. सर्वजण या रोमटामेळात उत्साहात सहभागी होतात, अशी माहिती येथील सल्लागार ऍड. नारायण सावंत, प्रेमानंद लक्ष्मण सावंत, गंगाधर वासुदेव सावंत, श्री तोणयेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुशांत चंद्रकांत सावंत, तसेच सतीश उसपकार, अभिलाष तारी, अनंत तारी, कपिल मेणकूरकर यांनी दिली. यावेळी येथील देवस्थानाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.