शाहुवाडी / प्रतिनिधी
कोतोली-वारणा (ता. शाहूवाडी) येथील २४ वर्षीय युवकाने बंदुकीची गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. मयुर शिवाजी पाटील असे त्या युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत शाहूवाडी पोलिस व घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, मयुर हा गावातीलच ज्ञानदेव महादेव कुंभार यांचेकडे पाण्याची पाईप आणण्यासाठी गेला होता. दरम्यान, यावेळी ज्ञानदेव कुंभार यांच्या पत्नी भारती कुंभार या एकट्याच घरी होत्या. यावेळी कुंभार यांच्या घरात असलेली बंदुक मयुर याने हातात घेऊन आमच्या पाहुण्यालाही अशीच बंदुक विकत घ्यायची आहे, असे म्हणून बंदुक हातात घेतली. यावेळी भारती कुंभार पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्या असता या संधीचा फायदा घेऊन मयुरने बंदुक डोक्याला लावून गोळी झाडून आत्महत्या केली. सदर घटना समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक अनिल कदम यांच्यासह, पोलिस निरिक्षक विजय पाटील यांनी भेट दिली.