राजापूर-वाटूळमधील प्रकार, तिघांविरूध्द गुन्हा ,बंदुकीत अडकलेली गोळी काढताना घडली घटना
वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यातील नवेदर येथे बंदुकीच्या गोळीने मृत्यूची घटना ताजी असतानाच वाटूळ येथे बंदुकीच्या गोळीने एकजण गंभीर जखमी झाला आहे. बंदुकीत अडकलेले काडतूस काढताना ही घटना घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. 23 जानेवारी रोजी झालेल्या या घटनेत पांडुरंग भुर्के जखमी झाले असून या प्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शौकत हाजू, जगदीश वळंजू आणि पांडुरंग भुर्के यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओणी येथील शौकत महंमद हाजू यांच्या बंदुकीत काडतूस अडकल्याने ते काढण्यासाठी त्यांचा चालक जगदीश वळंजू याने वाटूळ येथील पांडुरंग भूर्के यांच्याकडे बंदूक आणून दिली. 23 जानेवारी रोजी भुर्के वाटूळ स्मशानभूमीलगत जंगलात एका झाडाखाली बंदुकीत अडकलेले काडतूस काढत असताना बंदुक हातातून निसटून खाली पडली. यामध्ये बंदुकीतून दोन काडतूसे फायर होऊन ती भुर्के यांच्या डाव्या दंडातून आरपार झाली. या घटनेत भुर्के गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शौकत हाजू, जगदीश वळंजू आणि पांडुरंग भुर्के यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र गुरूवारपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करत आहेत. नवेदर येथे बंदुकीची गोळी लागून एकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा असतानाच वाटूळ येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.