शहर पोलीस ठाण्याची कारवाई, सेवानिवृत्त जवानाच्या घरातूनच चोरली होती बंदूक
प्रतिनिधी/ सातारा
संभाजीनगर येथे रहात असलेले वर्णे गावचे सेवानिवृत्त जवान संजय जातक यांची अज्ञात चोरटय़ाने डबल बारची बंदूक आणि 14 जिवंत काडतुसे चोरुन नेली होती. या चोरीचा छडा सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने काही तासात उघडकीस आणत बंदूक चोरणाऱया बहिणभावांची रवानगी थेट जेलमध्ये करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीची बंदूक आणि जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संभाजीनगर येथील आर्मीतील सेवानिवृत्त जवान संजय मुरलीधर जातक यांची त्यांच्या खोलीमधून डबल बोअरची बंदूक आणि 14 जिवंत काडतुसे दि. 12 एप्रिल 2022 ते दि. 22 मे 2022 दरम्यान अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेली होती. त्याबाबतची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. ही चोरी गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी चोरी उघडकीस आणण्याच्या सूचना सातारा शहर पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक या प्रकरणाच्या तपासास लागले. त्यांनी प्रवीण रामू पवार (वय 19, मुळ रा. उडगी, ता. मागेवाडी, जि. विजापूर, हल्ली रा. चंदननगर) या संशयितास जानाई मळाई नावाच्या डोंगराच्या पायथ्यापासून ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली. नंतर त्याने ती बंदूक त्याची बहिण संगीता विजय राठोड (वय 30, रा. उडगी, ता. मागेवाडी, जि. विजापूर) हिच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. जानाई मळाई डोंगर परिसरात लपवून ठेवलेली बंदूक हस्तगत केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऑचंल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, पो. ना. विक्रम माने, पो. कॉ. संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, सागर गायकवाड यांनी केलेली आहे.