दहा तोळे सोने, दोन लाखाच्या रोकडीवर डल्ला
वार्ताहर/ निपाणी
निपाणी शहर व उपनगरात गेल्या तीन महिन्यांत चोरटय़ांनी अनेक घरे लक्ष्य करताना सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखेंचा ऐवज लंपास केला आहे. दिवसागणिक होणाऱया या चोरीच्या घटना थांबविण्यात आणि चोरटय़ांना शोधण्यात पोलिसांना अजूनही यश आले नाही. अशा परिस्थितीत यमगर्णीसारख्या गावात एका रात्रीत सहा घरफोडय़ा झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या धाडसी चोरीमध्ये चोरटय़ांनी दहा तोळे सोन्याचे दागिने, दोन लाखाची रोकड असा सुमारे दहा लाखाचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे नागरिकांत दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी सकाळी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची काही घरे उघडी असल्याचे ज्या-त्या शेजाऱयांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी पाहणी केली असता घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकल्याचे निदर्शनास आले. यातून चोरीची घटना घडल्याचे स्पष्ट झाले. एकामागून एक अशा सहा बंद घरांमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस येताच नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठसे तज्ञांसह पूजा या श्वानालादेखील पाचारण करण्यात आले.
बंद घरे लक्ष्य करताना चोरटय़ांनी रेणुका मंदिरानजीक असणाऱया कल्लाप्पा रामा धनगर यांच्या घरातून लप्पा, बोरमाळ गंठण, गळापेटी, अंगठी असे पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तेथून जवळच असणाऱया बंगारी हलाप्पा डोळे यांच्या घरातून एक तोळे सोन्याचे दागिने व वीस हजाराची रोकड लंपास केली. मल्लाप्पा भागोजी पिसोत्रे यांच्या घरातून अडीच तोळे सोन्याचे दागिने व दीड लाखाची रोकड लंपास केली आहे. बुदिहाळ रोड येथे रंगनाथ विलास कुंभार यांच्या घरातून कर्णफुले व कर्णवेल असे एक तोळे सोन्याचे दागिने व 11 हजाराच्या रोकडीवर चोरटय़ांनी डल्ला मारला. माळभाग येथील सिद्धू नागू डोळे यांच्या घरात चोरटय़ांच्या हाती दागिने लागलेले नसून त्यांनी 1500 रुपये रोकड लंपास केली आहे.
ग्राम पंचायत कार्यालयाच्या मागील बाजूस असणाऱया सोनाबाई दगडू चौगुले यांचे बंद घर फोडले. पण त्याठिकाणी चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही. घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे यमगर्णीसह परिसरातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सुरेश कुंभार, ग्राम पंचायत कार्यालय, कॅनरा बँक, महालक्ष्मी मेडिकल या चार ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहेत. या माध्यमातून चोरटय़ांचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. सीपीआय, संगमेश शिवयोगी, फौजदार आनंद कँरकेट्टी, हवालदार पी. बी. कांबळे, एम. ए. तेरदाळ, एस. एफ. मळली आदींनी घटनास्थळी भेट देताना पंचनामा केला.