शासकीय दूध योजना बंद असताना नवीन मशीन का? मनसेची चौकशीची मागणी
प्रतिनिधी / कणकवली:
वागदे येथील शासकीय दूध योजना बंद असताना तेथे सुमारे सात ते आठ लाख रुपये किमतीचे नवीन सीटीबीटी युनिटचे इलेक्ट्रिकल मशीन देण्यात आले आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी आलेली ही नवीन मशीन धूळ खात पडून आहे. दूध योजना बंद असताना ही मशीन देण्यामागचा उद्देश काय, असा सवाल करत याप्रकरणी चौकशीची मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्राr यांनी केली आहे. दरम्यान, या मशीनची मनसेतर्फे पूजा करण्यात आली. मेस्त्राr, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, उपशहर अध्यक्ष शरद सावंत, विभाग अध्यक्ष दत्ताराम अमृते आदी उपस्थित होते.
वागदे येथील शासकीय दूध योजना, कणकवली ही 2015 पासून पूर्णपणे बंद आहे. तरीही सुमारे सात ते आठ लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रिकल सीटीबीटी युनिट खरेदी करून का पाठविण्यात आले? योजना बंद असल्यापासून दरमहा 40 ते 50 हजार रुपयांचे हाय टेन्शनचे थ्री फेज कनेक्शन वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे दुग्ध शाळेचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. सद्यस्थितीत या शासकीय दूध योजनेमध्ये दोन पहारेकरी काम करत आहेत. कार्यालयीन अधीक्षक व लिपीक रत्नागिरी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असून त्यांच्यावर योजनेतील कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु मनसे कार्यकर्ते तीन ते चारवेळा योजनेत माहिती घेण्यासाठी गेले असता, कुणीही उपस्थित नव्हते, असे या पदाधिकाऱयांनी सांगितले.
याबाबत अखेर लिपीक संजय सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. बंद दुग्धशाळेची गेल्या सहा महिन्यांपासून धूळ खात पडलेले हे नवीन मशीन भंगारात काढण्याची अधिकाऱयांची मानसिकता आहे का? असा सवाल करण्यात आला. जिल्हय़ातील दुग्ध सहकारी संस्था पूर्ववत सुरू करण्यासाठी आवाज उठविला जात नाही. कोल्हापूरच्या प्रतिभा डेअरी या खासगी डेअरीला दूध घातल्याप्रकरणी संस्थांचे सुमारे दोन कोटी 50 लाख रुपये गेली तीन वर्षे थकीत आहेत. याबाबत दुग्ध खात्याचे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. जिल्हा दुग्ध विकास अधिकारी पी. के. आवटे हे गेले सहा महिने जिल्हय़ात आलेले नाहीत. तर मग जिल्हय़ातील दुग्ध संस्थांचा विकास कसा काय होणार? याची दखल पालकमंत्री का घेत नाहीत? जिल्हय़ातील सर्व आमदार, खासदार आणि पालकमंत्री बंद पडलेल्या दूध डेअरीकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप करत मनसेच्यावतीने निषेध करण्यात आला.
मनसेतर्फे लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येणार असून जिल्हय़ातील सर्व दुग्ध सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱयांनी माजी आमदार, मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर तसेच जिल्हय़ातील मनसे पदाधिकाऱयांशी संपर्क साधण्याचे आवाहन दया मेस्त्राr यांनी केले आहे.