पालशेत येथील घटना : उपसरपंच महेश वेल्हाळ यांनी आक्षेप घेतल्यावर घटना झाली उघड
प्रतिनिधी / गुहागर
गुहागर तालुक्यातील पालशेत येथे माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी या सुरू असलेल्या मोहीमेमध्ये बंद असलेल्या ऑक्सिमिटर व टेम्प्रेचर घेऊन सर्वे केला जात होता. उपसरपंच महेश वेल्हाळ व काही सदस्यांनी सदर बाब उघडकीस आणून ही दोन्ही तपासणी उपकरणे बदलून घेतली आहेत. मात्र मोहीमेमध्ये सहभागी सदस्यांनी बुधवारी दिवसभर केलेली तपासणी खरोखरच इच्छीत साध्य करणारी झाली का असा सवाल केला जात आहे. गुहागर तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या मोहीमेला सुरूवात केली आहे. पालशेतमध्ये बुधवारपासून ही मोहीम सुरू झाली. सदर मोहीम सुरू करताना उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामकृती दलालाही विश्वासात घेतले गेलेले नसल्याचे महेश वेल्हाळ यांनी सांगितले. मोहीमेच्या नियोजनात्मक सभेला पर्यवेक्षिका, सरपंच सौ. संपदा चव्हाण, पोलिस पाटील, तलाठी, आरोग्य सेविका, अशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस हे सर्व उपस्थित होते. मात्र काही सदस्यांना व आपल्याला याची कल्पना नाही. बुधवारी ही मोहीम सुरू असताना उपसरपंच महेश वेल्हाळ यांच्या येथे तपासणीकरीता आली. अशावेळी तपासणी करताना वापरात असलेले ऑक्सिमिटर व टेम्प्रेचर गन बंद असल्याचे दिसून आले. तपासणीमध्ये ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांचे ऑक्सिमिटर लेवल 80 पर्यंत दाखवत होती. हीच लेवल प्रत्येकाला दिसून येत होती. यामुळे त्या ऑक्सिमिटरकडे बारकाईने पाहील्यावर ते बंद असल्याचे निदर्शनात आले. यावेळी उपसरपंच महेश वेल्हाळ, ग्रामपंचायत सदस्य मिनार पाटील, महेश तोडणकर, नाना पालकर, उदय साळवी व विलास गुहागरकर यांनी ही बाब निदर्शनात आणून दिली. यामुळे गुहागर पंचायत समितीमधून नवीन ऑक्सिमिटर व टेम्प्रेचर गन नेऊन पुन्हा सर्वे सुरू करण्यात आला.