वार्ताहर/ कराड
अंबवडे (ता.कराड) येथून देवदर्शन करून परतत असताना वांग नदीवरील जुन्या बंधाऱयावरून सुमारे 25 फुट खोल नदीपात्रात चौघेजण असलेली दुचाकी पडून झालेल्या अपघातात आजी व नातवाचा मृत्यू झाला. तर 9 वर्षाच्या मुलीने वडिलांचे प्राण वाचवले. शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास ही दुदैवी घटना घडली. मालन भगवान यादव (वय 52) व पियुष शरद यादव (वय 5) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेने येरवळे परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवळे (ता. कराड) येथील शरद भगवान यादव हे आई मालन, मुलगी तनुजा व मुलगा पियुष यांना दुचाकीवरून अंबवडे येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनाहून परतत असताना अंबवडे-कोळेवाडीच्या मध्ये वांग नदीवर असणाऱया जुन्या वांग बंधाऱयावर आले असता खडीवरून त्यांची दुचाकी घसरल्याने दुचाकीसह ते चौघेही थेट 25 फुट खोल नदीपात्रात पडले. कराड शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका यादव यांचे ते कुटुंबीय आहेत.
नऊ वर्षाच्या तनुजाला चांगले पोहता येत असल्याने तिने वडील, भाऊ व आजीला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. यात तिला वडिलांना वाचवण्यात यश आले. दुचाकी पाण्यात पडल्यानंतर अंधाराची तमा व भीती न बाळगता तनुजाने प्रथम वडिलांना पाण्याच्या बाहेर आणून काठावर बसवले. नंतर तिने आजीला पाण्याबाहेर आणण्याचा प्रयत्न केला. अंधार असल्यामुळे तिला पियुष दिसला नाही. आरडाओरडा ऐकल्यानंर शेजारी असणारे नागरिक धावत आले. त्यांनी आजीला पाण्याबाहेर काढले. त्यावेळी त्यांना पियुष पाण्यात असल्याचे समजल्यावर पियुषलाही बाहेर काढण्यात यश आले. मालन यादव यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पियुषला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक फौजदार विठ्ठल खाडे करीत आहेत.