ऑनलाईन टीम / पुणे :
येत्या 21 जुलैला देशभरात बकरी ईद हा सण साजरा होत असून हा सण कोरोनाचे राज्य सरकारने ठरवून दिलेले नियम पाळूनच साजरा करायचा आहे. यंदा देखील ईद साजरी करताना गेल्या वर्षीचेच निर्बंध कायम ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली आहे.
कोरोनाची राज्यातील स्थिती पाहता गेल्या वर्षापासूनच राज्यात साजरे होणारे विविध सण, उत्सव आणि महोत्सवांवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. सर्व सण हे साधेपणाने साजरे करण्याचे आवाहनही राज्य सरकार वेळोवेळी करत असते. यंदा देखील 21 जुलैला साजरी होणारी बकरी ईद साधेपणाने साजरी केली जाली असे आवाहन नुकतेच राज्याच्या गृह विभागानेही केले आहे.
राज्यातील कोरोना नियंत्रणात असला तरी काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्याच प्रमाणे राज्याला करोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका असून आजही काळजी घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे. हे लक्षात घेता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करू नये असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. हे लक्षात घेत राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात सर्व सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे.
- बकरी ईदेची नमाज मशीद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा करू नये.
- नागरिकांनी ईदेची नमाज आपल्या घरीच अदा करावी.
- जनावरांचे बाजार सध्याच्या कोरोना काळात बंदच राहतील.
- नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने जनावरांची खरेदी करावी, किंवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावीत.नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
- प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.
- या निर्बंधांमध्ये बकरी ईदेनिमित्त कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही.
- बकरी ईदेच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये.