कसाई खाना व शेड भाडेतत्वावर देण्याकरिता आज लिलाव
प्रतिनिधी/ बेळगाव
महसूल वाढीसाठी महानगरपालिकेने व्यापारी गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव मोहिम सुरू केली आहे. कोनवाळगल्ली येथील मटन मार्केट आणि बकरी ठेवण्याचे शेड तसेच कसाई गल्ली येथील कसाईखाना भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. कत्तलखान्यासाठी प्रति महिना 35 हजार रूपये भाडे ठरविण्यात आले आहे. याला भाडेकरू मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.
भाडेतत्वावर देण्यासाठी सोमवार दि. 12 रोजी सकाळी 11 वाजता लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. कसाईगल्ली येथील फिशमार्केटमधील 20 पैकी 13 गाळय़ांना भाडेकरू मिळाले आहेत. फिशमार्केटच्या मागील बाजुस असलेले बकरी ठेवण्याचे शेड आणि कसाई खाना भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. सदर इमारती नव्याने उभारण्यात आल्या आहेत. पण मागील 3 वर्षांपासुन याचे भाडे महानगरपालिकेला मिळाले नाही. मात्र कसाई खाना आणि बकरी ठेवण्याच्या शेडचा वापर मटण मार्केटमधील व्यापारी करीत असतात. तर येथील व्यापाऱयांना विश्वासात घेऊन बकरी ठेवण्याचे शेड आणि कसाई खाना शुक्रवारी रिकामी करून ताब्यात घेण्यात आला आहे. याकरिता सोमवारी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. कसाई खान्यासाठी प्रति महिना 35 हजार रूपये भाडे आणि 5 लाख 50 हजार रूपये अनामत रक्कम घेण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले आहे. त्यामुळे महापालिकेला प्रतिमहिना 35 हजार रूपये भाडे देणारा भाडेकरू मिळणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तसेच बकरी ठेवण्याच्या शेडकरीता प्रति महिना 25 हजार रूपये भाडे आणि 5 लाख रूपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. सदर शेड व कसाईखाना मटन मार्केटमधील व्यवसायिकांना गरजेचा आहे. त्यामुळे सदर लिलाव प्रक्रियेत व्यापाऱयांनी सहभाग घ्यावा लागणार आहे.
कोनवाळगल्ली येथील मटन मार्केटच्या गाळय़ांची व इमारतीची दुरावस्था झाली होती. या मार्केटच्या इमारतीची डागडुजी करून दुरूस्ती करण्यात आले आहे. त्यामुळे सदर मार्केट देखील भाडेतत्वावर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याठिकाणी दोन व्यापारी गाळे आणि बकरी ठेवण्याचे शेड आहे. याकरिता प्रत्येक महिना पाच हजार रूपये भाडे आणि 50 हजार रूपये अनामत रक्कम ठरविण्यात आली आहे. कोनवाळगल्ली व कसाई गल्ली येथील गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी बोली लागणार आहे.