मंडणगडातील ६ महिन्यात ५०० महिलाउद्योग सुरू करण्याचे उद्दिष्ट
प्रतिनिधी / खेड
शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी लघुउद्योगाचे जाळे विणून रोजगाराची चिंता कायमचीच संपुष्टात आणणार आहे. शिवतेज’च्या माध्यमातून खुले झालेल्या महिला बचतगट कक्षाद्वारे तीनही तालुक्यात येत्या ६ महिन्यात ५०० उद्योग सुरू करण्याचे उद्दिष्ट असून महिनाभरात १२० उद्योग सुरू करणार असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकारांना दिली.
खांबतळेजवळील महिला बचतगट कक्षाचे उद्घाटन माजी पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते रामदास कदम तसेच आमदार योगेश कदम यांच्याहस्ते झाले. उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महिलांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योगांची उभारणी करण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. या घोषणेची परिपूर्तता महिला बचत गटाच्या कक्षाद्वारे होत असून याद्वारे केवळ बेरोजगार महिलांच्या हाताला काम देवून त्यांच्यामध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील अनेक महिला छोट्या मोठ्या उद्योगांद्वारे कुटुंबांचा रहाटगाडा हाकत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. या महिलांना मुख्य प्रवाहात आणून महिला बचतगट कक्षाद्वारे तीनही तालुक्यातील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी लघुउद्योगांची निर्मिती केली जाणार आहे. याद्वारे बेरोजगार महिलांच्या हाताला काम देत त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महिला बचतगट कक्षाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम देण्याबरोबरच उद्योगांबाबत मोफत मार्गदर्शनही केले जाणार आहे. यामुळे महिला बचतगट कक्ष महिलांसाठी नक्कीच वरदान ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला. बेरोजगार महिलांनी आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी महिला बचतगटातील कक्षाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही शेवटी केले. याप्रसंगी जि.प. सदस्य अरूण कदम, पंचायत समिती सभापती विजय कदम, उपसभापती जीवन आंब्रे, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शहरप्रमुख निकेतन पाटणे, उपनगराध्यक्ष सुनिल दरेकर, संदिप कांबळे, महिला आघाडीच्या शहर संघटक माधवी बुटाला यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.