वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा आंतरराष्ट्रीय मल्ल बजरंग पुनिया सध्या अमेरिकेत कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या या प्रशिक्षणाचा कालावधी संपणार होता. पण आता या कालावधीत आणखी एका महिन्याची वाढ करण्यात आली आहे. पुनियाचे प्रशिक्षण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत अमेरिकेत चालू राहणार असल्याची माहिती साईच्या मिशन ऑलिंपिक सेलतर्फे (एमओसी) देण्यात आली.
बजरंग पुनिया सध्या अमेरिकेतील मिशिगन येथील क्लिफ केन कुस्ती क्लबमध्ये सरावासाठी वास्तव्य करीत आहे. या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जेदार मल्लांबरोबर सराव करण्याची संधी बजरंग पुनियाला लाभली आहे. बजरंग पुनियाचा अमेरिकेतील मुक्काम आता एक महिन्यासाठी वाढल्याने या कालावधीत त्याला 11.65 लाख रूपयांचा खर्च येणार असून साईने ही रक्कम मंजूर केली आहे. 4 डिसेंबरपासून बजरंग पुनिया अमेरिकेत कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. आगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत बजरंग पुनियाने आपले तिकीट यापूर्वीच आरक्षित केले आहे. विश्व कुस्ती स्पर्धेत पुनियाने कांस्यपदक मिळविले होते.