वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारा भारतीय मल्ल बजरंग पुनिया तसेच रौप्यपदक विजेता रवी दाहिया यांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत भारतीय प्रशिक्षकांनाच पसंती दिली आहे. भारताचे हे दोन्ही अव्वल मल्ल भारतीय प्रशिक्षकासमवेत कुस्तीचा सराव करतील.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आतापासूनच भारतीय मल्लांच्या पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे. भारतीय मल्लांना विदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी बराच कालावधी खर्च करावा लागत असल्याने भारतीय कुस्ती फेडरेशनने विदेशी प्रशिक्षकाऐवजी देशातील अव्वल प्रशिक्षकांकडे मार्गदर्शनाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय मल्लांना आता आपल्याच देशातील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. भारतीय मल्लांना आता छत्रसाल स्टेडियममध्ये अनेक भारतीय प्रशिक्षकांनी प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे.
बजरंग पुनियाला यापूर्वी जॉर्जियाचे शाको बेन्टिनिडिस यांचे तर रवी दाहियाला रशियाचे प्रशिक्षक कमाल मलिकोव्ह यांचे मार्गदर्शन लाभले होते. बजरंग पुनियाबरोबरचा बेन्टिनिडिस यांचा प्रशिक्षकाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुनिया नव्या प्रशिक्षकाच्या शोधात होता. काही दिवसांपूर्वी रशियामध्ये बजरंग पुनियाचा सराव चालू होता. दरम्यान, भारतीय मल्लांना प्रशिक्षण देण्यासाठी रशियातील प्रशिक्षकांनी भारतात येण्यास नकार दिला. या रशियन प्रशिक्षकांच्या अटी बजरंगला मान्य नसल्याने तो दुसऱया प्रशिक्षकाच्या शोधात होता. सध्या पुनियाचे वास्तव्य मॉस्कोमध्ये असून त्याने आपला कुस्तीचा सराव भारतीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
विदेशी कुस्ती प्रशिक्षक भारतामध्ये येण्यास का नाखुश आहेत, हे समजू शकले नाही. भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्या निश्चित कोणत्या अडचणी आहेत, त्याचा खुलासा होऊ शकला नाही. 27 वषीय बजरंग पुनिया भारतीय रेल्वे खात्यामध्ये नोकरी करीत आहे. आता रेल्वे क्रीडा मंडळाकडून नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती अपेक्षित असल्याचे पुनियाने म्हटले आहे. यापूर्वी सत्पाल सिंग यांचे बजरंग पुनियाला मार्गदर्शन लाभले होते. पुन्हा सत्पाल सिंग यांचेच बजरंगला छत्रसाल स्टेडियममध्ये सकाळच्या सत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण सत्रामध्ये बजरंग पुनियासमवेत त्याचा साथीदार अरुण कुमारचाही सहभाग राहील. भारताचा आणखी एक मल्ल दीपक पुनिया याला यापूर्वी रशियन प्रशिक्षक मुराद गैदारोव्ह यांचे मार्गदर्शन लाभत होते. पण टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत त्यांचा करार झाला होता. आता दीपक पुनियाला वीरेंद्र कुमार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दीपक पुनिया दाखल होत आहे. कोरोना महामारी समस्येमुळे विदेशी कुस्ती प्रशिक्षक भारतामध्ये येण्यास नाखुश असल्याचे सांगण्यात आले.