भारताची कुस्ती मोहीम आजपासून, रवि दहिया देखील प्रबळ दावेदार, 7 मल्ल रिंगणात उतरणार
टोकियो / वृत्तसंस्था
किमान 3 पदकांची अपेक्षा असणाऱया कुस्तीत भारताची ऑलिम्पिक मोहीम आजपासून (मंगळवार, दि. 3) प्रारंभ होत असून बजरंग पुनिया व विनेश फोगट यांच्यावर मुख्य स्पॉटलाईट असणार आहे. भारताचे एकूण 7 मल्ल यंदा रिंगणात उतरले आहेत. त्यात भारताला किमान 3 पदके अपेक्षित आहेत. सोनम मलिकच्या कुस्तीने भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा श्रीगणेशा होईल.
कुस्तीमध्ये भारतीय पथक बरेच महत्त्वाकांक्षी असून किमान 3 मल्ल पोडियमवर पोहोचावेत, अशी अपेक्षा असणार आहे. बजरंग पुनिया (65 कि. फ्री स्टाईल) व विनेश फोगट (53 किलोग्रॅम), रवि दहिया (57 किलोग्रॅम फ्री स्टाईल) यांच्याकडून येत्या काही दिवसात पदक अपेक्षित असेल.
19 वर्षीय सोनम ही सर्वप्रथम मॅटवर उतरेल. ती 62 किलोग्रॅम गटातून प्रतिनिधित्व करत आहे. मंगोलियाची आशियाई रौप्यजेती बोलोर्तुया खुरेल्खू हिच्याविरुद्ध तिची सलामीची लढत रंगेल. सोनम व अंशू मलिक या दोघीही 19 वर्षांच्या मल्ल अनप्रेडिक्टेबल मानले जातात आणि याचमुळे त्यांच्याकडून आशाअपेक्षाही अधिक आहेत. अंशूकडे सरस खेळ साकारण्याची क्षमता असून कितीही मजबूत प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवण्याला लागणारी ताकद व गुणवत्ता तिच्याकडे आहे. या उभयतांवर कोणतेही दडपण नाही. त्यामुळे, पदकाविना परतण्याची वेळ आली तरी ते अनुभवाने संपन्न झालेले असणार आहेत. मात्र, अनप्रेडिक्टेबल असल्याने त्या जोरदार कामगिरी करतील व विजयश्री खेचून आणू शकतील, अशी अपेक्षा आहे.
अनुभवी विनेश त्या तुलनेत अव्वलमानांकित आहे आणि जपानच्या मायू मुकेडाचा अपवाद वगळता रिंगणातील प्रत्येक प्रतिस्पर्धीला जेरीस आणण्याची तिच्याकडे ताकद आहे. विनेशने आपला बचाव अलीकडे आणखी भक्कम केला असून काऊंटर-ऍटॅकच्या स्कील्सवर तिचा खेळ अधिक बहरतो, हा अनुभव आहे.
पुरुष गटात बजरंगकडून मुख्य अपेक्षा
यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष गटात बजरंगकडून मुख्य अपेक्षा असणार आहेत. बजरंग जागतिक स्तरावर आदराने नाव घेतले जाते, अशा मोजक्या अनुभवी मल्लांपैकी एक असून मागील 10 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने 6 सुवर्ण, 3 रौप्य व 1 कांस्य जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. सुपेरियर स्टॅमिना हे बजरंगचे बलस्थान आहे. आता त्याच्या लेग डिफेन्सची पारख होणार का, हे प्रत्यक्ष लढतीत दिसून येईल. बजरंग अतिशय तगडय़ा स्पर्धा असलेल्या गटात समाविष्ट असून किमान 5 ते 6 मल्ल सुवर्ण जिंकण्याची क्षमता असणारे आहेत.
रवि दहिया हा देखील पदकाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, त्याच्याकडे प्रतिस्पर्ध्यांचे फारसे लक्ष नाही, असे एकंदरीत चित्र आहे. रवि दहिया तांत्रिकदृष्टय़ा सरस आहे, त्याच्याकडे ताकद व स्टॅमिना आहे आणि बऱयाचदा तांत्रिक सरस खेळाच्या बळावर तो विजय खेचून आणतो. येथे मात्र त्याला कुठेही गाफिल राहून अजिबात चालणार नाही. त्याच्या गटात यूगुएव्ह (रशिया) व सुलेमान अतली (तुर्की) हे मुख्य प्रतिस्पर्धी असतील.
2019 वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यजेता रवि 2020 विश्वचषकानंतर एकदाही रिंगणात उतरलेला नाही. डाव्या ढोपराच्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने अलीकडेच पोलंड ओपनमध्ये भाग घेतला होता.