नवी दिल्ली
दुचाकी विक्रीतील मोठी कंपनी बजाज ऑटोला मार्चअखेर तिमाहीत 1 हजार 332 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. वर्षामागे हा नफा 1 हजार 310 कोटी रुपये इतका होता. वर्षाच्या तुलनेत पाहता नफ्यात 1.6 टक्के इतकी वाढ दिसली आहे.
तिमाहीच्या आढाव्यानुसार नफा 14 टक्के कमी झाला आहे. दुसरीकडे वर्षाच्या तुलनेत तिमाहीत महसूल 26 टक्के वाढून 8 हजार 596 कोटी रुपये इतका झाला आहे. मागच्या वेळेला महसूल 6 हजार 815 कोटी रुपयांचा झाला होता. दरम्यान गाडी विक्रीत दोन अंकी वाढ मात्र कंपनीने नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये चौथ्या तिमाहीत मोटारसायकलच्या भारतातील विक्रीत 18 टक्के वाढ दिसली आहे. सदरच्या कालावधीत 5 लाख 34 हजार 119 वाहनांची विक्री करण्यात आली आहे. जी मागच्या वर्षी समान कालावधीत 4 लाख 78 हजार 160 इतकी होती.
पल्सर 125 या गाडीने ग्राहकांची मोठी पसंती मिळवली असल्याचे दिसून आले आहे. 1 लाख 28 हजार इतक्या पल्सर गाडय़ा विक्री करण्यात आल्या आहेत. मागच्या वर्षी चौथ्या तिमाहीत 51 हजार पल्सर विक्री झाल्या होत्या. दुसरीकडे बजाज ऑटोने निर्यातीत चांगला वाटा उचलला आहे.