जून तिमाहीमधील आकडेवारी सादर : वर्षाच्या आधारे नफा दुप्पट : बाजारात 65 टक्के वाटा
वृत्तसंस्था /मुंबई
वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून ओळख असणाऱया बजाज ऑटो कंपनीने आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत मजबूत कामगिरी केली असल्याची माहिती आहे. याबाबतचा अहवाल कंपनीने गुरुवारी सादर केला आहे. कंपनीचा निव्वळ नफा हा एप्रिल ते जून या दरम्यान 1,061 कोटी रुपयांवर राहिला आहे. जो वर्षाअगोदर समान कालावधीमधील तिमाहीत 528 कोटी रुपये राहिला होता. म्हणजे वर्षाच्या आधारे कंपनीचा नफा हा दुप्पट झाला असल्याचे सांगितले आहे.
कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार जून तिमाहीत कंपनीची उलाढाल ही 7,715 कोटी रुपयांवर राहिली आहे. जी मार्च तिमाहीत 8,880 कोटी रुपये आणि वर्षभर अगोदरच्या तिमाहीत 3,417 कोटी रुपयांवर राहिली असल्याची माहिती आहे. कंपनीचे विविध कामगिरीमधून मिळालेले उत्पन्न 3,079 कोटी रुपयांनी वधारुन 7,386 कोटी रुपयांवर राहिले होते.
वाहन विक्री
ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोने विक्रीत चांगले प्रदर्शन केले आहे. बजाज ऑटोने देशातील बाजारात जवळपास 3.42 लाख मोटारसायकल्सची विक्री केली आहे. यासोबतच 14 हजार व्यावसायिक वाहनांची विक्री करण्यातही कंपनीला यश आलं आहे. बाजारात बजाज ऑटोची हिस्सेदारी 65.3 टक्के राहिली. जी मार्च तिमाहीत 56.3 टक्क्यांवर होती.