ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बजेटनंतर सरकारी तेल कंपन्यांनी आज सामान्य जनतेला झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याबरोबरच स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीतही वाढ केली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, 14.2 किलोचा सिलेंडर 25 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे दिल्लीत सिलेंडरचा दर 719, कोलकाता मध्ये 745.50 रुपये, चेन्नईत 735 आणि मुंबईत या सिलेंडरची किंमत 694 रुपयांवरुन 719 रुपये झाली आहे.
19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कंपन्यांनी कपात केली आहे. दिल्लीत 1539 वरून आता 1533, कोलकाता मध्ये 1604 वरून आता 1598.50 रुपये तर मुंबईत या सिलेंडरच्या किंमत पाच रुपयांनी कपात होऊन तो 1482.50 रुपयांचा झाला आहे.
- पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतही वाढ
पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रण मुक्त करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दररोज याचे दर बदलत असतात. त्यानुसार, आज डिझेलच्या किंमतीत 35 ते 37 पैशांनी वाढ झाली तर पेट्रोलच्या किंमतीत 35 ते 34 पैशांनी वाढ झाली. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किंमती आजवरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत.
दिल्लीत डिझेल 76.83 रुपये तर पेट्रोल 86.65 रुपये इतके झाले आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये डिझेल अनुक्रमे 80.41 रुपये, 83.63 रुपये आणि 82.04 रुपये इतके आहे. तर पेट्रोल 88.01रुपये, 93.20 आणि 89.13 रुपये इतके वाढले आहे.