प्रतिनिधी/ बेळगाव
काकती येथील बटर विक्री करणाऱया कुटुंबातील मुलीने दहावी परीक्षेत 95.04 टक्के गुण मिळवून शिवबसवनगर येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिने कन्नड विषयामध्ये 125 पैकी 124 गुण घेतले आहेत. घरची हलाखीची परिस्थिती असताना तिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
साक्षी विनायक पिंगट असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील आणि आई दोघेही दहावी नापास आहेत. त्यामुळे घरामध्येच बटर तयार करून बेकरींना विक्री करत असतात. साक्षीही आपल्या आई-वडिलांना बटर करण्यासाठी मदत करत होती. तिने शिकवणी न घेता हे यश मिळविले आहे. हिंदीमध्ये 100, इंग्रजीमध्ये 98, गणितमध्ये 90, समाज विज्ञानमध्ये 94, विज्ञानमध्ये 88 असे गुण घेतले आहेत. या यशाबद्दल काकती परिसरात अभिनंदन होत आहे.