वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्हय़ात रविवारी तपासणीसाठी गेलेल्या वैद्यकीय पथकावर स्थानिकांनी हल्ला केला. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात तपासणी मोहीम सुरू केली आहे. रविवारी तपासणी पथकासह पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. वैद्यकीय पथकातील कर्मचाऱयांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यत 207 कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण उपचारानंतर बरे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.