ऑनलाईन टीम / श्रीनगर :
काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील झोलवा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी रात्री चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असून, सध्या या भागात शोधमोहीम सुरू आहे.
आयजीपी काश्मीर यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री बडगाम जिल्ह्यातील झोलवा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहिम हाती घेण्यात आली. या भागात सुरक्षा दलांचा वेढा घट्ट होताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. याला सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले.
ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. यामधील एक जण श्रीनगर शहरातील रहिवाशी असून, त्याचे नाव वसीम आहे. घटनास्थळावरून तीन एके-56 रायफल्ससह दारूगोळा आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.