ड्रग्ज कंट्रोल विभागाची धाड: होमिओपॅथीऐवजी ऍलोपॅथीचे उपचार करणाऱया डॉक्टरवर कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
अधिकृत नोंदणी व परवाना नसताना बेकायदेशीरपणे हॉस्पिटल थाटून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱया एका डॉक्टरच्या हॉस्पिटलवर ड्रग्ज कंट्रोल विभागाने आरोग्य खात्याच्या साहाय्याने धाड टाकून सर्व साहित्य जप्त केले आहे. बडस क्रॉस येथे ‘आशीर्वाद’ या नावाने सदर डॉक्टरने हॉस्पिटल थाटले होते.
बडस क्रॉस येथे आनंद एम. यडाळ या होमिओपॅथी पदवी असणाऱया डॉक्टरने आशीर्वाद हॉस्पिटल सुरू करून तेथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली होती. याची माहिती ड्रग्ज कंट्रोल विभागाला मिळताच सदर खात्याचे साहाय्यक औषध नियंत्रक रघुनाथ, तालुका आरोग्य अधिकारी तसेच आयुष विभागाच्या अधिकाऱयांनी अचानक धाड टाकली.
डॉक्टरला धरले धारेवर
सदर डॉक्टरकडे होमिओपॅथीची पदवी असून तो ऍलोपॅथीचे उपचार करत होता. रुग्णांना हायर ऍन्टी बायोटीक्स व स्टेरॉईड्स दिल्याचेही आढळून आले. या ठिकाणी कोरोनाबाधितांना दाखल करण्यात आले असून त्यांना ऑक्सिजन सिलिंडरही लावल्याचे अधिकाऱयांना आढळले. अधिकाऱयांनी रुग्णांकडे अधिक चौकशी करून डॉक्टरला चांगलेच धारेवर धरले व हॉस्पिटलला टाळे ठोकून तेथील सर्व वैद्यकीय साहित्य जप्त केले.
कोरोनाकाळात एकीकडे रुग्णांचे बरेच हाल होत आहेत. दुसरीकडे डॉक्टर आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. तर याच कोरोनाच्या संकटाचा फायदा घेऊन ग्रामीण भागात पदवी नसलेले डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत. नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन ड्रग्ज कंट्रोल विभागाने केले आहे. केपीएमईचे नोडल अधिकारी डॉ. एम. व्ही. किवडसण्णवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सुनडोळ्ळी, आरोग्य निरीक्षक मंजुनाथ बिसनळ्ळी, सुनील गायकवाड, औषध नियंत्रक अधिकारी, उपनियंत्रक अधिकारी रघुनाथ व उदय किशोर यांनी ही कारवाई केली.