दक्षिण आफ्रिकेचा माजी जलद गोलंदाज मखाया एन्टिनीचे प्रतिपादन
दुबई / वृत्तसंस्था
2008 यू-19 कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत विराटने भारताला जेतेपद संपादन करुन दिले आणि नंतर तोच वरिष्ठ संघात पोहोचला. दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा देखील याच वाटेने वरिष्ठ संघात दाखल झाला. यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने असे बडे खेळाडू येथेच घडतात, असे प्रतिपादन दक्षिण आफ्रिकेचा माजी जलद गोलंदाज मखाया एन्टिनीने केले. यंदाची युवा विश्वचषक स्पर्धा दि. 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत खेळवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयसीसीसाठी लिहिलेल्या एका स्तंभात त्याने हे मत मांडले.
‘यू-19 विश्वचषक स्पर्धेत जे खेळाडू आपल्या संघाचे प्रतिनिधीत्व करतात, तेच पुढे आंतरराष्ट्रीय संघापर्यंत पोहोचतात. दक्षिण आफ्रिकेत तर विशेषतः तरुणाईमध्ये क्रिकेटबद्दल बरीच तळमळ आहे आणि क्विन्टॉन डी कॉक, रबाडा हे त्यांचे आयकॉन आहेत. या खेळाडूंना त्यांच्या उमेदीच्या कालावधीत आणखी कोठूनही निवडले गेले नव्हते तर युवा विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातूनच त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले’, असे एन्टिनी पुढे म्हणतो.
‘वयाच्या 19 व्या वर्षी खेळाडू खेळ फक्त समजून घेत असतात आणि यामुळे यू-19 विश्वचषक स्पर्धा त्यांच्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरते. माझा चिरंजीव थँदो हा देखील 2018 मध्ये या स्पर्धेतून खेळला आहे आणि मी सुद्धा या वयोगटातून खेळलो आहे’, असे एन्टिनी म्हणाला. दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गज गोलंदाजाने 101 कसोटीत 390 तर 173 वनडे 266 बळी घेतले आहेत.