प्रतिनिधी / काणकोण
खोतीगाव पंचायत क्षेत्रातील बड्डे वाडय़ापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर अकस्मात भूस्खलन होऊन भुयार तयार झाले असून या भुयाराचा आकार साधारणपणे 3 चौ. मी. इतका असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या भुयारापासून जवळच येथील लोक भातशेती करतात. अकस्मात तयार झालेल्या भुयाराची माहिती समजताच रोहिदास गावकर, महादेव गावकर, तांबडो गावकर, संदीप गावकर या ग्रामस्थांनी त्या जागी धाव घेतली. या ठिकाणी पाहणी केली असता भुयार बरेच खोलवर गेलेले असून खालून पाण्याचा आवाज येत असल्याचे जाणवले.
भुयाराची पातळी आणि खोली समजणे कठीण झालेले आहे. आत सर्वत्र अंधार दिसत आहे. या भुयार परिसराची जमीन दलदलीची भासत आहे. विशेष म्हणजे 2009 साली ज्यावेळी काणकोण तालुक्यात महापूर आला होता त्यावेळी देखील याच भागात भूस्खलन झाले होते. मागच्या आठवडय़ात सतत पडलेल्या पावसामुळे हा प्रकार घडला असावा, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.