तापसी पन्नूने व्यक्त केली व्यथा
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तापसीने अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यासारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे, तरीही पॉप्युलर ए-लिस्टमधील अभिनेते माझ्यासोबत काम करू इच्छित नाहीत, माझ्यासोबत पडद्यावर झळकण्यास ते टाळाटाळ करतात असे तापसीचे मानणे आहे.
नवे कलाकार देखील माझ्या चित्रपटांमध्ये काम करू इच्छित नाहीत. माझा डबल रोल असलेल्या चित्रपटात काम करण्यास एका अभिनेत्याने नकार दिला होता. एका अन्य अभिनेत्याला माझ्यासोबतच्या चित्रपटाचा प्रस्ताव देण्यात आला, या अभिनेत्याने पूर्वी सोबत काम केले होते. पण अभिनेत्याने चित्रपटात नायिकेला सहानुभूती मिळत असल्याचे म्हणत नकार दिला होता.
निर्मात्यांसोबत जेव्हा माझी बैठक होते, तेव्हा माझ्यासमोर आघाडीच्या अभिनेत्यांची यादी असते. पण ते माझ्यासोबत काम करू इच्छित नाहीत, कारण या चित्रपटांमध्ये नायिकेला अधिक महत्त्व मिळत असल्याने ते टाळाटाळ करत असल्याचे तापसी म्हणाली. तापसी अलिकडेच ‘रश्मि रॉकेट’ या चित्रपटात दिसून आली होती. लवकरच ती ‘लूप लपेटा’ चित्रपटातून झळकणार आहे. याचबरोबर भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज हिचा बायोपिक ‘शाबास मिथु’मध्ये ती काम करत आहे. अनुराग कश्यपचा ‘दोबारा’ तसेच स्वतःच्या होम प्रॉडक्शनचा चित्रपट ‘ब्लर’मध्ये ती दिसून येणार आहे.