आपल्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱयाला बढती दिल्याने नाराज
प्रतिनिधी/ बेंगळूर
भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाचे (एसीबी) अतिरिक्त पोलीस महासंचालक टी. सुनिलकुमार यांनासेवानिवृत्तीला दोन दिवस असतानाच महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. राज्य सरकारचा हा आदेश वादग्रस्त ठरला आहे. सेवाज्येष्ठतेचा निकष बाजूला ठेवून सुनिलकुमार यांना बढती देण्यात आल्याने वन खात्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रविंद्रनाथ यांनी राजीनामा दिला आहे.
सेवाज्येष्ठतेनुसार आपल्यापेक्षा कनिष्ट असणाऱया आयपीएस सुनिलकुमार यांना बढती देण्यात आल्याने सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ रविंद्रनाथ यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालकांपैकी सेवाज्येष्ठतेमध्ये अमरकुमार पांडे यांच्या क्रमांक सर्वात आधी लागतो. त्यानंतर रविंद्रनाथ व त्यानंतर सुनिलकुमार यांचा क्रमांक लागतो. मात्र, अमरकुमार पांडे आणि सुनिलकुमार यांना बढती देऊन रविंद्रनाथ यांना डावलण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे नाराज झालेले रविंद्रनाथ यांनी राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांच्याकडे राजीनामापत्र सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवीण सूद यांच्या भेटीसाठी मुभा न मिळाल्याने रविंद्रनाथ कंट्रोल रुमकडे राजीनामा सादर केला तसेच ते पोलीस महासंचालकांपर्यंत पोहोचविण्यास सांगितले आहे.
एक दिवसाचे महासंचालक
बढती बुधवारी सायंकाळी बढती मिळाल्याने आयपीएस सुनिलकुमार यांनी गुरुवारी सीआयडी आणि आर्थिक गुन्हे विभागाच्या महासंचालकपदाची सुत्रे स्वीकारली. शुक्रवारपासून दोन दिवस शासकीय सुटी असल्याने 31 ऑक्टोबर रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होतील. त्यामुळे गुरुवारच्या एकच दिवसाकरिता त्यांना महासंचालकपद सांभाळावे लागत आहे.
राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी सेवाज्येष्ठतेच्या आधारे आयपीएस अधिकाऱयांना बढती देण्याबाबत दुर्लक्ष केले आहे, असा आरोप होत आहे. दोन दिवसांत निवृत्त होणाऱया सुनिलकुमार यांना बढती देणे योग्य असले तरी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱया रविंद्रनाथ यांना प्रवीण सूद यांनी चर्चा केली असती तर राजीनामा देण्याची परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे.