प्रतिनिधी / मिरज
ओळखीचा फायदा घेऊन, फोटो काढून बदनामी करण्याची धमकी देऊन विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, विजय दत्ता मगदूम (वय 39, रा. सांगलीकर मळा, मिरज) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिलेने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, विजय आणि पीडित महिला हे एकमेकांना ओळखत होते. याच ओळखीचा फायदा घेऊन विजयने महिलेला भेटण्यास बोलाविले. महिलेने नकार दिला असताना त्याने नवऱ्याला फोन करण्याची तसेच गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईलाजास्तव महिला भेटण्यास आली. त्यावेळी विजय याने तिच्या सोबत फोटो काढला. तसेच सदर फोटो नवऱ्याला दाखवून तसेच सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली.
त्यानंतर पीडित महिलेला एसटी स्टँडजवळील पद्मा लॉजमध्ये नेऊन बलात्कार केला. तसेच घरी परतत असताना मालगाव रस्त्यावरील उसाच्या शेतात नेऊन पुन्हा बलात्कार केला. घडल्या प्रकाराबाबत महिलेने घरच्यांना माहिती दिली. त्यानुसार नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी विजय मगदूम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.