प्रतिनिधी / पणजी :
शेळ मेळावली या पंचायत क्षेत्रातील याठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या लता गावकर यांची बदली केली ती चुकीची होती. याशिवाय महिला व बाल कल्याण खात्यातर्फे बजावण्यात आलेल्या नोटीसीमध्ये लता गावकर यांनी खात्याला योग्य उत्तर देणे गरजेचे आहे. याचबरोबर महिला व बालकल्याण खात्याने लता गावकर यांना कामावरून न काढता त्यांची बदली व नोटीस रद्द करावी आणि त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी गोवा सरकारी कर्मचारी असोसिएनशचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी केली.
गोवा सरकारी कर्मचारी असोसिएनशचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांच्या अध्यक्षतेखाली अभिनेता राजदीप नायक, गुळेली येथील शुभम यांनी महिला व बाल कल्याण खात्यासमोर धरणे धरून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला.
लता गावकर यांनी सोशल मीडिया व वेगवेगळय़ा घटकांच्या आधारे सरकारवर व खात्यावर आरोप केला असल्याने महिला व बाल कल्याण खात्यातर्फे गावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक युवा बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे लता गावकर यांना कामावरून काढू नये अशी मागणी जॉन नाझारेथ यांनी केली आहे.
लता गावकरसारखी प्रकरणे राज्यात प्रत्येक ठिकाणी होतात. परंतु लोक बोलायला येत नाहीत. अशाप्रकारच्या घटनांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. एकही संघटना लता गावकर यांना पाठिंबा देण्यासाठी आली नाही. रक्षाबंधनापूर्वी लता गावकर यांची बदली रद्द करावी अशी मागणी अभिनेता राजदीप नायक यांनी केली आहे.