देहरादून
उत्तराखंडच्या उच्च हिमालयीन क्षेत्रातील प्रसिद्ध धाम बद्रीनाथ आणि केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी जाऊ पाहणाऱया भाविकांची कमाल मर्यादा वाढवत आता ती प्रतिदिन 3 हजार करण्यात आली आहे. गंगोत्री धामसाठी भाविकांची कमाल प्रतिदिन संख्या 900 तर यमुनोत्री धामसाठी 700 करण्यात आली आहे. हेलिकॉप्टर सेवेचा वापर करून धामांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱया भाविकांची संख्या यात सामील नसल्याचे चारधाम देवस्थानम मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
देवस्थानम मंडळाने चारधाम यात्रेसाठी काही दिवसांपूर्वीच राज्याबाहेरून येणाऱया भाविकांसाठी कोरोनामुक्त चाचणी अहवालाची अनिवार्यता हटविली होती. या निर्णयानंतर धामांच्या दर्शनासाठी ई-पास मागणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मंडळाने चारही धामांच्या दर्शनाकरता भाविकांची कमाल संख्या वाढविली आहे. बद्रीनाथ धाममध्ये आता प्रतिदिन 3000, केदारनाथ धाममध्ये 3000, गंगोत्रीमध्ये 900 आणि यमुनोत्रीमध्ये 700 भाविक पोहोचू शकतील, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविनाथ रमण यांनी दिली आहे. तत्पूर्वी मंडळाने चमोली, रुद्रप्रयाग तसेच उत्तरकाशीच्या जिल्हाधिकाऱयांकडून यासंबंधी अहवाल मागविला होता. बद्रीनाथ धाम चमोली जिल्हय़ात तर केदारनाथ धाम रुद्रप्रयाग जिल्हय़ात आहे. तसेच गंगोत्री आणि यमुनोत्री उत्तरकाशी जिल्हय़ात आहे. यापूर्वी बद्रीनाथ धाम येथे जाण्यासाठी 1200, केदारनाथ धामसाठी 800, गंगोत्रीसाठी 600 तसेच यमुनोत्रीसाठी कमाल 400 भाविकांनाच अनुमती दिली जात होती.