उत्तराखंड सरकारचा मास्टरप्लॅन : 481 कोटींचा प्रल्प : 85 हेक्टरमध्ये संग्रहालय, कलादालनासह देवदर्शन स्थळाची उभारणी
वृत्तसंस्था / देहरादून
उत्तराखंडच्या चारधामांपैकी एक बद्रीनाथ धामलाही केदारनाथच्या धर्तीवर विकसित करण्याचा मास्टरप्लॅन राज्य सरकारने तयार केला आहे. हा मास्टरप्लॅन 481 कोटी रुपयांचा असून तो 2025 पर्यत साकारण्याची योजना आहे. बद्रीनाथ क्षेत्राला मिनी स्मार्ट सिटीप्रमाणे विकसित करण्याचा सरकारचा विचार आहे.
हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास देशातील अन्य मंदिरांनाही याच धर्तीवर विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पासंबंधी बद्रीनाथ धामला पर्यटनस्थळाऐवजी आध्यात्मिक केंद्राच्या स्वरुपात विकसित करण्याचा सुचनावजा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. मास्टरप्लॅननुसार 85 हेक्टर क्षेत्रात बद्रीनाथ धाम विकसित केले जाणार आहे.
या क्षेत्रात एक संग्रहालय, कलादालनही निर्माण करण्यात येणार आहे. तेथे पोहोचणारे भाविक चित्रफितीच्या माध्यमातून भगवान विष्णू यांच्या दशावताराची कथा जाणून घेऊ शकतील. कनेक्टिव्हिटी आणि पार्किंगची व्यवस्थाही असणार आहे. पूर्ण नियोजन अधिकाऱयांच्या पातळॅवर केले जात आहे. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेवरून राज्य सरकारशी चर्चा केल्याची माहिती बद्रीनाथचे धर्माधिकारी भुवनचंद उनियाल यांनी दिली आहे.
मास्टरप्लॅनचे स्वरुप
बद्रीनाथसह तेथील सर्व पौराणिक आणि आध्यात्मिक ठिकाणांना जोडले जाणार आहे. नव्या संपर्कव्यवस्थेमुळे भाविकांची यात्रा सुलभ होईल असे उत्तराखंड चारधाम देवस्थानम् बोर्डाचे माध्यमप्रभारी डॉ. हरीश गौड यांनी सांगितले आहे. बद्रीनाथ धाममध्ये आकर्षक रोषणाई केली जाणार असून ती या क्षेत्रातील आध्यात्मिक वातावरणाच्या अनुरुप असणार आहे. स्थानिकांना लाभ व्हावा याकरता होम स्टेची व्यवस्था सुरू केली जाणार आहे. बद्रीनाथ क्षेत्रातील शीशनेत्रा आणि बद्रीश या सरोवरांचाही विकास केला जाईल. या धामच्या परिसरातील 5 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात येणारी सर्व तलावे, ऐतिहासिक धार्मिक स्थळे आणि रस्त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. बद्रीनाथमध्ये पार्किंग सुविधा आणि सेतू निर्मितीची योजान आहे. सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमस्थळावरील केशवप्रयाग, व्यास गुहा, गणेशगुहाही या योजनेत सामील आहे.
वर्षभर चालणार निर्मितीकार्य
बद्रीनाथ धाम हिवाळय़ात भाविकांसाठी बंद असते, परंतु केदारनाथ धामप्रमाणेच तेथे पूर्ण 12 महिने निर्मितीकार्य सुरू राहणार आहे. ऋषिकेश, कर्णप्रयोग रेल्वेप्रकल्प आणि चारधाम महामार्ग योजनेवरही काम सुरू आहे. शंकराचार्या यांचे समाधीस्थळ, सरस्वती घाट, दोन ध्यान गुहांचे काम पूर्ण होऊ घातले आहे. ब्रह्मकमळची रोपवाटिकाही तयार केली जात आहे.
पंतप्रधानांसोबत बैठक
बद्रीनाथच्या मास्टरप्लॅनवरून पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, पर्यटनमंत्री सतपाल महाराज, मुख्य सचिव ओमप्रकाश, सचिव दिलीप जवळकर, उत्तराखंड चारधाम देवस्थानम व्यवस्थापन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविनाथ रमण सहभागी झाले होते.