उत्तर प्रदेशातील अलिगडमधील ज्वालापुरी कुलपे बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक आकारांची लहान मोठी कुलपे बनतात जी भारतात सर्वत्र खरेदी केली जातात. येथे राहणारे सत्यप्रकाश शर्मा हे कुलुपे बनविण्यातील जागतिक तज्ञ समजले जातात. त्यांनी जगातील सर्वात मोठे कुलूप बनविल्याचे प्रतिपादन नुकतेच केले आहे. हे कुलूप 6 फूट लांब, 3 फूट रूंद असून त्याचे वजन 350 किलो असल्याचे सांगण्यात येते. हे कुलूप गेल्यावर्षीच तयार होणार होते. तथापि लॉकडाऊनमुळे कारखान्यातील काम थांबल्याने याची निर्मिती लांबली.
कुलुपे बनविण्याच्या कामात सत्यप्रकाश शर्मा यांचा परिवार गेली 100 वर्षे आहे. प्रथम ते पितळेची कुलुपे तयार करीत होते. याच तंत्राचा उपयोग करून त्यांनी हे नवे सर्वात मोठे कुलूप बनविले आहे. अर्थात त्याची किल्लीही तितकीच मोठी असून ती 10 लिव्हरची आहे. पण इतक्या मोठय़ा कुलुपाचा उपयोग काय असा प्रश्न आहे. शर्मा म्हणतात, प्रचंड दरवाजांसाठी किंवा तिजोऱयांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. पण ते तयार करण्यामागचा मुख्य हेतू काहीतरी नवं करून दाखवायचं हाच आहे, असे शर्मा यांचे नजीकचे कुटुंबिय म्हणतात.