दोघांना अटक : साहित्यासह ओळखपत्रे जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
विविध सोसायटी, इंडस्ट्रिज, फायनान्स यांच्या नावाने बनावट ओळखपत्रे तयार करण्यात येत असल्याची माहिती खडेबाजार पोलिसांना मिळाली. त्यानंतर कडोलकर गल्लीतील त्या प्रिंटिंग प्रेसवर धाड टाकून साहित्य जप्त करण्यात आले.
याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विश्वनाथ मुचंडी (वय 35) रा. कडोलकर गल्ली आणि रोहित सुनिल कुट्रे (वय 23) रा. भातकांडे गल्ली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध कंपन्यांच्या नावे बनावट ओळखपत्रे तयार करण्यात येत होती. त्याची माहिती खडेबाजार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली.
पोलिसांनी प्रिंटिंग प्रेसमधील साहित्य तसेच ओळखपत्रे जप्त केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खडेबाजार पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.