ऑनलाईन टीम / वाराणसी :
बनावट कोविशिल्ड लस आणि बनावट कोविड टेस्टिंग किट तयार करणाऱ्या टोळीचा एसटीएफ वाराणसी युनिटने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील पाच जणांना एसटीएफने लंका परिसरातील रोहित नगर येथून अटक केली असून, त्यांच्याकडून 4 कोटींचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
एसटीएफ वाराणसी युनिटचे डेप्युटी एसपी विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिल्ड युनिटच्या टीमला बनावट कोविड किट आणि लसींबाबत सतत माहिती मिळत होती. त्याआधारे लंका पोलिस ठाण्यांतर्गत रोहित नगर कॉलनी येथील फ्लॅटमध्ये छापा टाकण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून मोठय़ा प्रमाणात बनावट कोविड टेस्टिंग किट, बनावट कोविशिल्ड लस, बनावट झायकोव्ह डी लस, पॅकिंग मशीन, रिकामी शीशी, स्वॅब स्टिक आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. ज्याची अंदाजित किंमत अंदाजे 4 कोटी रुपये आहे. येथून तयार करण्यात आलेली बनावट लस व किट्स वेगवेगळय़ा राज्यांना पुरविण्यात येत होती, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली असून, अधिक तपास सुरू असल्याचेही विनोद कुमार यांनी सांगितले.