जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताला सतर्कतेचा इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे कोरोनाची भीती काहीशी कमी होत असतानाच बनावट लसी सापडण्याचे प्रकार उघड झाल्याने देशात खळबळ निर्माण झाली आहे. भारतामध्ये कोव्हिशिल्ड लसीच्या ‘2 एमएल’च्या वायल्स आढळून आल्या आहेत. पण कोव्हिशिल्डची निर्मिती करणाऱया सिरम इन्स्टिटय़ूटने 2 एमएलच्या वायल्स आपण तयार न केल्याचे स्पष्ट केल्याने त्याला ‘सिरम’कडून दुजोरा मिळाला आहे. बनावटगिरीच्या या प्रकारानंतर जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून भारताला सतर्क राहण्याची सूचना केली आहे. यापूर्वी युगांडामध्येही 10 ऑगस्टला एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोव्हिशिल्ड लसींची एक बॅच आढळून आली होती. त्यामुळे डब्ल्यूएचओने यासंदर्भात अधिक जागरुक राहण्याचे आवाहन केले होते.
‘बनावट लसी जागतिक आरोग्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरत असून कोरोना होण्याची शक्मयता अधिक असलेल्या नागरिकांसाठी गंभीर ठरू शकतात. या बनावट लसी तातडीने शोधून काढून हटवणे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. तसेच, बनावट लसींचा धोका लक्षात घेता डब्ल्यूएचओने सर्व हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, आरोग्य केंदे, वितरक, फार्मसी आणि वितरणाच्या इतर सर्व टप्प्यांवर योग्य परीक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पण कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्मयता लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने लसीकरण मोहीमेवर भर दिला आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लस मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. भारतात सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरू आहे. तसेच अन्य तीन लसींनाही देशात परवानगी देण्यात आलेली आहे.