प्रतिनिधी/ पणजी
आमदार अपात्रताप्रकरणी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर बनावट दस्तावेज सादर केल्याप्रकरणी पणजी पोलिसांत सादर केलेली तक्रार पोलिसांनी अजून नोंदवून न घेतल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयासमोर याचिका सादर केली असून या याचिकेवर दि. 23 जून 2021 रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षातून 10 आमदार भारतीय जनता पक्षात विलीन होण्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात काँग्रेस पक्षाचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर, नीळकंठ हळर्णकर, आंतानसियो मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, आंतोनियो फर्नांडिस, फ्रान्सिस्को सिल्वेरा, विल्प्रेड डिसा, क्लाफासिओ डायस, फिलीप रॉड्रिग्स उपस्थित होते. या आमदारांस काँग्रेस पक्ष भाजपात विलीन करण्याचा ठराव झाला. हा ठराव पक्षाचे पदाधिकारी प्रसाद आमोणकर यांनी सादर केला होता व त्याला दुसरे पदाधिकारी जितेंद्र गांवकर यांनी अनुमोदन दिले होते. या ठरावावर आणखीन 53 सदस्यांनी सही केली होती. असा दस्तावेज सभापतींसमोर सादर करण्यात आला व फक्त 10 आमदारच फुटले नाहीत तर संपूर्ण पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय झाल्याचे भासवण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या लेटरहेडवर सदर ठराव टंकलिखित करुन सभापतींसमोर सादर करण्यात आले. हा दस्तावेज पूर्णपणे खोटा असल्याचा दावा गिरीश चोडणकर यांनी केला होता. या बनावट दस्तावेजाच्या आधारे 10 आमदारांना पात्र ठरविण्यात आले, असे चोडणकर यांचे म्हणणे आहे. हा खोटा दस्तावेज तयार करुन तो खरा असल्याचे भासवून सभापतींच्या न्यायालयासमोर सादर केल्यामुळे गुन्हा होत असून भादंसंच्या कलम 192, 193, 199, 200, 209, 463, 465, 471, 473, 476 व 120 बी खाली पोलिसांनी गुन्हा नोंदवून घ्यावा असे नमूद करुन दि. 20 एप्रिल 2021 रोजी गिरीश चोडणकर यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दिली व दि. 5 मे 2021 रोजी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली पण पोलिसांनी अजून गुन्हा नोंदवून घेतला नसल्याने आता चोडणकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे