प्रतिनिधी / सातारा
९४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा व देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ११ रोजी ठाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिग साबळे यांना तीन इसम कोळेवाडी, ता. कराड येथील एम. एस. ई. बी सबस्टेशन जवळ एकत्र येणार असून त्यांच्याजवळ भारतीय चलनातील २ हजार व ५०० रुपयांच्या बनावट नोटा आहेत. अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना सांगितली. संबंधित इसमावर कारवाईचे आदेश मिळतात आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेषांतर करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा लावला.
पथकाला तीन पंधरा वर्षांत संशयित व्यक्ती आढळून आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना हटकले असता ते पळून जात असताना पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ हजार व ५०० रुपयांच्या एकूण ९४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या तसेच त्यापैकी एका इसमाच्या पॅंटला एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आल्याने यांच्याविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
कारवाईत पोलीस हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबिर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाने, मयूर देशमुख यांनी सहभाग घेतला.