वार्ताहर/ विजापूर
लॉकडाऊनच्या काळात अति महत्त्वाच्या सेवेसाठी पास देण्यात येत आहेत. असेच बनावट पास बनविल्याप्रकरणी प्रेस फोटोग्राफरला पोलिसांनी सोमवारी अटक केली. सुनील उर्फ मामाश्री गायकवाड असे संशयिताचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, लॉकडाऊनच्या काळात जिल्हा प्रशासन अति महत्त्वाच्या सेवेसाठी पासेस देण्यात येत आहेत. येथील प्रेस फोटोग्राफर व स्वयंघोषित पत्रकार सुनील उर्फ मामाश्री गायकवाड हा महानगर पालिकेच्या नावावर बनावट पास तयार करून तो त्याची विक्री करीत होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महानगर पालिकेचे महसूल अधिकारी महेश यांनी जलनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याची दखल घेऊन पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता तो आपल्या संगणकावर महानगरपालिकेचे लेटर पॅड व खोटे शिक्के तयार करून बनावट सही करून पासेस विकत होता, असे आढळून आले. जिल्हा पोलीसप्रमुख अनुपम अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जलनगरच्या पीएसआयनी राजाजीनगर येथे सुनीलच्या घरावर धाड टाकून प्रिंटर, कॉम्प्युटर व शिक्के व इतर सामुग्री जप्त केली.
जलनगर पोलीस ठाण्यात सुनीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 8 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सुनीलने ज्यांना ज्यांना बनावट पासेस दिले आहेत, त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.